नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरात भाड्याने राहायचे आणि संधी साधून घरमालकाच्या वाड्यातील सोयाबीनच लंपास करायचे, असा धक्कादायक प्रकार नांदुरा शहरातील दुर्गा नगर परिसरात उघडकीस आला आहे. जुने न्यायालय इमारतीजवळील वाड्यातील खोलीत ठेवलेले तब्बल २० कट्टे सोयाबीन, अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे, भाडेकरूनेच चोरून नेल्याचा आरोप आहे. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी दुर्गा नगर येथील ललिता राजेश निखाडे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या सासू वाड्यात जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेल्या असताना वाड्याच्या आजूबाजूला सोयाबीन पडलेले दिसले. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता खोलीच्या दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेला आढळून आला.यानंतर फिर्यादीच्या सासू व पतीने खोलीत जाऊन पाहणी केली असता तेथे ठेवलेले सोयाबीनचे कट्टे गायब असल्याचे दिसून आले.
याबाबत वाड्यात भाड्याने राहणाऱ्या गणेश परमेश्वर पैसोडे याच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता तो खोलीत आढळून आला नाही. खोलीला कडी लावलेली होती. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, तो खोलीतील सामान कोणालाही काहीही न सांगता घेऊन निघून गेल्याचेही निदर्शनास आले.
या सर्व प्रकारावरून गणेश परमेश्वर पैसोडे यानेच सोयाबीन चोरून नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार राहुल ससाने करीत आहेत.













