Advertisement Advertisement

शेतातली केबल नेण्यावरून गावात तुफान राडा! थेट घरात घुसले तिघे, पती-पत्नीला बदडले; जातिवाचक शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातून केबल नेण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे घडली. गावातीलच तीन जणांनी एका कुटुंबाच्या घरात घुसून पती-पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर जातिवाचक व अश्लील शिवीगाळ करून पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उमरा देशमुख येथील मोहन गजानन गवई (वय ५०) हे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कुटुंबीयांसह घरी होते. यावेळी गावातीलच तीन आरोपी त्यांच्या घरात अनधिकृतपणे घुसले. शेतातून केबल नेण्याच्या कारणावरून त्यांनी मोहन गवई यांच्याशी वाद घातला. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी मोहन गवई व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जातिवाचक व अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी मोहन गवई यांच्या तक्रारीवरून १७ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वासहा वाजता डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, एपीआय गणेश इंगोले आणि पीएसआय विजय अजमेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे करीत आहेत.

तलावातील पाणी उपशावरून गावात धुसफूस!

दरम्यान, उमरा देशमुख येथील पाझर तलावातून पाणी उपसा करण्यास बंदी असतानाही सर्रासपणे पाण्याचा उपसा सुरू असल्याचा आरोप होत आहे. यामुळे गावात वादाचे वातावरण निर्माण होत असून, पाणी उपशाच्या मुद्द्यावरून तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पाझर तलावातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!