Advertisement Advertisement

लग्नाचा खर्च केला, सोनं दिलं; तरी सासरच्यांची पैशाची भूक कायम! आठ दिवसांतच नव्या नवरीचा छळ सुरू, दोन लाखांसाठी धाडमध्ये गुन्हा!

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाचा थाटामाटात खर्च, पतीला सोन्याची चेन आणि अंगठी देऊनही नवविवाहितेचा संसार सुखाचा झाला नाही. लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांतच सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहेरून दोन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिल्याची तक्रार विवाहितेने धाड पोलिसांत केली आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेचा विवाह ८ फेब्रुवारी २०२६ रोजी नरेंद्र साळवे याच्यासोबत रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नाचा संपूर्ण खर्च तिच्या वडिलांनी केला होता. तसेच पतीला सोन्याची चेन आणि अंगठीही भेट म्हणून दिली होती. लग्नानंतर सुरुवातीचे आठ दिवस सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली; मात्र त्यानंतर घरात क्षुल्लक कारणांवरून वाद घालणे, अपमानास्पद बोलणे आणि शिवीगाळ करण्याचे प्रकार सुरू झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

पती नरेंद्र हा तिच्याशी बोलणे टाळत दुसऱ्या खोलीत झोपत असे. तसेच तासनतास फोनवर बोलत असल्याचेही तिने नमूद केले आहे. पतीला यापूर्वीपासून आजार असल्याची माहिती लग्नापूर्वी लपविण्यात आल्याचा आरोपही विवाहितेने केला आहे. तो नैराश्य आणि झोपेच्या गोळ्या घेत असल्याचे समजल्यानंतर याबाबत विचारणा केली असता पतीकडून मारहाण होत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

दोन लाखांसाठी छळाचा आरोप!

पती नरेंद्र साळवे, सासरे किरण साळवे आणि सासू स्वाती साळवे हे तिला वारंवार माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत होते. पैसे आणले नाहीत तर चांगली वागणूक मिळणार नाही, अशा प्रकारे मानसिक त्रास दिल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. अखेर सततच्या छळाला कंटाळून तिने धाड पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!