बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असून, कृषी क्षेत्रासाठी अत्यंत निराशाजनक असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तुपकर म्हणाले की, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याबाबत कोणतीही कायदेशीर हमी किंवा ठोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी किमान आधारभूत दराची कायदेशीर हमी मागत असताना सरकारने पुन्हा एकदा याकडे दुर्लक्ष केले आहे.
सिंचनासाठी प्रलंबित असलेले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात केवळ घोषणाच करण्यात आल्या असून, प्रत्यक्षात निधीची तरतूद कागदावरच राहिली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
खतांच्या वाढत्या किमती आणि त्यावर मिळणारी तुटपुंजी सबसिडी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप करत, खत सबसिडी वाढविण्यासाठी तसेच शेतमाल साठवणूक व बाजारपेठेसाठी कोणतीही प्रभावी नवी यंत्रणा उभारण्यात आलेली नसल्याची टीका त्यांनी केली.
“हा अर्थसंकल्प उद्योगपतींसाठी पोषक असून शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागासाठी अन्यायकारक आहे. सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत,” असा घणाघाती आरोप करत रविकांत तुपकर यांनी येत्या काळात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
















