जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील राजुरा खुर्द शिवारात शिरच्छेद करून हत्या करण्यात आलेल्या तरुणीची ओळख अद्यापही पटलेली नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात झालेल्या गंभीर त्रुटींमुळे पोलिस विभागाची राज्यभरात मोठी बदनामी झाली असून आता मृत तरुणीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना सर्वसामान्य नागरिकांची मदत घ्यावी लागत आहे. यासाठी माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
जळगाव जामोद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा खुर्द शेतशिवारात आसिफ हमीद मुल्लाजी यांच्या शेतालगत नदीकाठी लिंबाच्या झाडाजवळ एका महिलेचा शिरच्छेद केलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. संबंधित महिलेची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष समोर आला आहे.
या प्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) व २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणीचे वर्णन….
पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून उंची साधारण ५ फूट ते ५ फूट ३ इंच आहे. तिचा रंग सावळा, शरीरयष्टी मध्यम आणि केस काळे आहेत. अंगात हिरव्या रंगाचा टॉप व काळ्या रेषा असलेली कथई रंगाची पॅन्ट होती. पायात गुलाबी रंगाच्या सॅन्डल, उजव्या हातात काळ्या रंगाचा धागा, डाव्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि गळ्यात काळ्या मण्यांची पांढऱ्या धातूची पोत आढळून आली आहे. आरोपींनी तिचे शीर धडापासून वेगळे करून धड व शीर दोन्ही जाळण्याचा प्रयत्न केला होता.
शिवानी प्रकरणानंतर तपासावर प्रश्नचिन्ह….
या प्रकरणातील मृतदेह हा शिवानी कलमेकर हिचाच असल्याचा दावा पोलिसांनी यापूर्वी केला होता. त्यानुसार तिच्या हत्येप्रकरणी वडील व भावाला अटकही करण्यात आली होती. मात्र नंतर शिवानी जिवंत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जिवंत असलेल्या तरुणीच्या कथित हत्येप्रकरणी निष्पाप व्यक्तींना अटक केल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर टीका होत आहे.
यामुळे आता राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जनतेकडे मदतीचे आवाहन केले असून मृत तरुणीची ओळख पटवून देणाऱ्या किंवा तपासास उपयुक्त माहिती देणाऱ्या व्यक्तीस ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वर्णनाशी साधर्म्य असलेल्या कोणत्याही बेपत्ता महिलेबाबत माहिती असल्यास तात्काळ जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क साधावा.














