चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शिर्डीवरून शेगावकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा चिखली–देऊळगाव राजा मार्गावरील रामनगर फाटा परिसरात नीलगायसोबत जोरदार अपघात झाला. मादी जातीची रोही (नीलगाय) अचानक रस्त्यावर आडवी आल्याने हा अपघात घडला.
धडक इतकी भीषण होती की नीलगाय उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या डिव्हायडरजवळ जाऊन पडली व जागीच ठार झाली. अपघातात एसटी बसचा समोरचा काच पूर्णतः फुटला असून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने बसमधील सुमारे ३५ प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली आहे.
सदर बसचे चालक दिपक जटाळ व वाहक परमेश्वर पिटकर (शेगाव आगार) हे आपले कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली. अपघातानंतर त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवली व सर्व प्रवाशांना सुरक्षित ठेवले. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अंचरवाडी बिटचे वनरक्षक गजानन पोटे व वनसेवक ऋषीकेश तुपकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत नीलगायचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
या परिसरात धरण असल्यामुळे वन्यप्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच अंचरवाडी परिसरात वनविभागाचा मोठा भूभाग असल्याने रोही (नीलगाय), रानडुक्कर, सायाळ, लांडगे व कोल्हे यांचा वावर या भागात नेहमीच आढळतो. त्यामुळे या महामार्गावर विशेषतः रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या मार्गावर सूचना फलक लावणे, गतीमर्यादा निश्चित करणे व अन्य खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने प्रवासी व एसटी प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.















