Advertisement Advertisement

बुलढाण्यात वीजचोरीचा मोठा भांडाफोड! नामांकित वाईन बारवर महावितरणची धाड; २.६० लाखांची वीज चोरी उघड…

सैलानी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा-सैलानी रोडवरील एका नामांकित वाईन बारमध्ये सुरू असलेल्या वीजचोरीचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. तब्बल ११ हजार २१४ युनिट्स म्हणजेच सुमारे २ लाख ६० हजार ३६० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी जागा मालक व वीज वापरकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैलानी रोडवरील रायपूर परिसरात असलेल्या साक्षी वाईन बार अँड रेस्टॉरंट (घर क्रमांक ३३९/३२५) येथे व्यावसायिक वीज कनेक्शनमध्ये फेरफार होत असल्याची माहिती महावितरणच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे यवतमाळ येथील भरारी पथकाचे प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन पांडुरंग सानप यांनी आपल्या सहकाऱ्यांसह १३ मार्च २०२६ रोजी दुपारी १.२० वाजता संबंधित ठिकाणी धाड टाकली.

तपासणीदरम्यान मीटरमध्ये अत्यंत शिताफीने छेडछाड केल्याचे उघड झाले. मीटरच्या डिस्प्लेवर ‘VC-Open’ (दि.२७/०४/२४) असा मेसेज दिसून आला. तसेच मीटरच्या बॉडीवरील डिव्हायडरला जोडलेला भाग जाणीवपूर्वक तोडण्यात आला होता. या छेडछाडीमुळे मीटर ‘पल्स’ देत नव्हते, परिणामी प्रत्यक्ष वीज वापर सुरू असूनही रिडींग वाढत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने जागा मालक सुभाष भिकाजी चिंचोले आणि वीज वापरकर्ते प्रकाश रामभाऊ खंडागळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यावरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गजानन सानप यांच्या फिर्यादीवरून विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर बुलढाणा शहर व परिसरातील वीजचोरांचे धाबे दणाणले असून, महावितरणकडून अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!