पलवल (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) : मैत्री म्हणजे जीवाभावाचं नातं म्हणतात, पण याच नात्याला तडा देणारी संतापजनक घटना पलवल जिल्ह्यातील गदपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पतीचा जिवलग मित्र असलेल्या सागर नावाच्या व्यक्तीनेच त्याच्या पत्नीवर पिस्तुलाचा धाक दाखवत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी ती घरात एकटी असताना आरोपी सागर घरात घुसला. घरात कोणी नसल्याची खात्री करून त्याने अचानक पिस्तूल काढून महिलेच्या कानाशी लावले. “ओरडलीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकी देत त्याने जबरदस्ती केली. एवढ्यावरच न थांबता जातानाही तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली.
घटनेनंतर महिला प्रचंड धक्क्यात होती. ती कोणाशीही बोलत नव्हती, सतत रडत होती. तिच्या वागण्यात झालेला बदल पती व कुटुंबीयांच्या लक्षात आला. वारंवार विचारल्यानंतर तिने अखेर घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.
कुटुंबीयांनी तातडीने गदपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.














