खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव तालुक्यातील लाखनवाडा बुद्रुक येथे अवैध रेती वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला धमकावून टिप्पर वाहन पळवून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८ जानेवारी २०२६) सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लाखनवाडा बुद्रुक येथील ग्राम महसूल अधिकारी पंढरीनाथ गजानन शिंदे (वय ४०) हे सहकाऱ्यांसह कर्तव्यावर असताना एमएच-२८-बीबी-८८११ क्रमांकाचा टिप्पर अवैधरित्या रेती वाहतूक करताना आढळून आला. सदर टिप्परने कौसर खान यांच्या घरासमोर रेती उतरविल्याचे निदर्शनास आल्यानंतर तहसीलदारांना माहिती देण्यात आली. टिप्पर हिवरखेड पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तो पोलिस ठाण्याच्या दिशेने नेत असताना आरोपींनी थरारक प्रकार घडवून आणला.
आंबेटाकळी चौफुलीवरून बोरी अडगाव रस्त्याने टिप्पर भरधाव वेगाने पळविण्यात आला. यावेळी दीपक आत्माराम ढोले (रा. मनसगाव, ता. शेगाव) व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी आरोपीने ग्राम महसूल अधिकाऱ्याला धमकावले, अपघाताची भीती दाखवली व चालत्या वाहनात वाद घातला. काही अंतरावर टिप्पर थांबवून फिर्यादीस जबरदस्तीने खाली उतरवून आरोपींनी टिप्पर बाळापूरच्या दिशेने सुसाट वेगाने पळवून नेला.
या घटनेप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (३), २२१, ३५१ (२), ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे. अवैध रेती वाहतुकीविरोधातील कारवाईदरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.














