मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेळगाव आटोळ येथे अंगणवाडी शाळेत झालेल्या वादातून अंगणवाडी सेविकेला मारहाण झाल्याची तर दुसऱ्या बाजूने सेविकेच्या पतीकडून विवाहित महिलेची छेडछाड झाल्याची परस्पर विरोधी तक्रार अवेरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही बाजूंविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी घडली.
अंगणवाडी सेविका स्नेहलता संजय बोर्डे (वय २७, रा. शेळगाव आटोळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या अंगणवाडी शाळेत कार्यरत असताना गावातील आशा प्रकाश बोर्डे यांच्या दोन मुली व मुलगा अंगणवाडी परिसरात खेळण्यासाठी आले होते. यावेळी लहान मुलगा घसरगुंडीवर खेळत असल्याने त्याला इजा होऊ नये म्हणून सेविकेने आशा बोर्डे यांना मुलांना अंगणवाडीत पाठवू नये असे सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या आशा प्रकाश बोर्डे, अश्विनी विनोद सुरडकर, शोभा प्रकाश बोर्डे, संजय प्रकाश बोर्डे व प्रकाश सिताराम बोर्डे यांनी अंगणवाडी येथे येऊन शिवीगाळ करत स्नेहलता बोर्डे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या डोक्याचे केस उपटले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेले सेविकेचे पती संजय उत्तम बोर्डे यांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीवरून अवेरा पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), १९१(२), १९०, १५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बीट जमादार करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने शोभा प्रकाश बोर्डे (वय ४५, रा. शेळगाव आटोळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंगणवाडी सेविका स्नेहलता बोर्डे या मुलांशी नीट वागत नसून १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलांवरून वाद झाला. यावेळी सेविकेने शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच भांडणादरम्यान सेविकेचे पती संजय उत्तम बोर्डे यांनी फिर्यादी विवाहितेचे दोन्ही हात पकडून वाईट उद्देशाने छेडछाड केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
या तक्रारीवरून अवेरा पोलिसांनी अंगणवाडी सेविका स्नेहलता संजय बोर्डे, संजय उत्तम बोर्डे, लिबाजी किसन आराख व मधुकर जाधव (रा. शेळगाव आटोळ) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, १९५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













