बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात अवघ्या २८ दिवसांत तब्बल १४८ महिला व मुली घर सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये १८ वर्षांखालील ५० मुलींचा समावेश असून, ही बाब पालक व प्रशासनासाठी मोठी चिंता ठरत आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनांमागे प्रेमप्रकरणे हे प्रमुख कारण ठरत आहे. त्याचबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिप, पर्यटनासाठी घर सोडणे, नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडणे यांसारखी कारणेही समोर आली आहेत. विशेष म्हणजे, लिव्ह-इन रिलेशनशिपचा प्रकार जिल्ह्यात नव्याने दिसू लागला आहे.
वर्षभरातील आकडेही धक्कादायक
२०२५ या वर्षात जिल्ह्यात ९५० महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील अनेकांचा शोध लागला असला तरी ७५ महिलांचा तपास अद्याप प्रलंबित आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये बेपत्ता झालेल्या १४८ महिलांपैकी १३३ महिला सापडल्या असून १५ जणींचा शोध सुरू आहे.
मुलींच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर आहे.
२०२५ मध्ये १६३ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी १४२ मुली सापडल्या, तर २१ अजूनही बेपत्ता आहेत.
यावर्षी मात्र एका महिन्यातच ५० मुली बेपत्ता, त्यापैकी ४० सापडल्या असून १० अजूनही शोधात आहेत.
बेपत्ता होण्यामागील प्रमुख कारणे
पोलिस तपासात पुढील कारणे समोर आली आहेत:
प्रेमप्रकरणे (सर्वाधिक प्रमाण)
कौटुंबिक वाद, पती-पत्नीतील तणाव
जबरदस्तीने लावलेली लग्ने
नोकरीच्या शोधार्थ घर सोडणे
लिव्ह-इन रिलेशनशिप
पर्यटन किंवा भ्रमंतीची इच्छा
काही प्रकरणांमध्ये मानसिक समस्या
काही महिलांनी लग्नानंतरही जुन्या प्रेमसंबंधांमुळे घर सोडल्याचे प्रकारही समोर आले आहेत, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांवर गंभीर परिणाम होत आहेत.
पालकांची चिंता वाढली
लहान वयातील मुलीही भविष्याचा विचार न करता घर सोडत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल बंद करून संपर्क तोडल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
“मुलींच्या हालचालींवर व संपर्कावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासाला मदत होऊ शकते,” असे मत महिला शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक कमला उमाळे यांनी व्यक्त केले.
सामाजिक जबाबदारीही महत्त्वाची
या वाढत्या घटनांमुळे केवळ पोलिस व प्रशासनच नव्हे, तर समाज व नातेवाईकांची जबाबदारीही वाढली आहे. मुलांचे संगोपन, संवाद आणि योग्य मार्गदर्शन याकडे दुर्लक्ष केल्यास अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.













