Advertisement Advertisement

काजू-बदाम आंदोलनानंतर पालकमंत्री अखेर बुलढाण्यात; शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का?!५० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज करतील पाहणी….

काजू-बदाम आंदोलनानंतर पालकमंत्री अखेर बुलढाण्यात; शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का?!५० दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर आज करतील पाहणी….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या जवळपास ५० दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. सोयाबीन, तूर, कापूस, उडीद यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात थांबून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटना व क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून सातत्याने करण्यात येत होती. मात्र, गंभीर परिस्थितीतही पालकमंत्री जिल्ह्यात दिसत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

याच पार्श्वभूमीवर चिखली येथे ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’ अशी भूमिका घेत अनोखे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले होते. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि शेतकरी संघटनेचे देविदास कणखर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पालकमंत्री गायब असल्याची तक्रारही चिखली पोलिसांच्या व तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.या आंदोलनाची चर्चा राज्यभर झाल्यानंतर अखेर पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील हे २३ सप्टेंबर रोजी रात्री बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच मुक्कामी दाखल झाले आहेत.

दरम्यान, आज २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आणि टंचाईच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची नेमकी परिस्थिती जाणून घेतात का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

‘उशिरा का होईना, बांधावर येताय; पण पंचनाम्यांचा फार्स नको!’

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत असताना पालकमंत्र्यांना यापूर्वीच जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ का मिळाला नाही, असा सवाल शेतकरी संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे. ‘काजू-बदाम’ आणि ‘भीक मांगो’ आंदोलनानंतरच पालकमंत्री जिल्ह्यात दाखल झाल्याची चर्चा शेतकरी वर्तुळात व जिल्ह्यात सुरू आहे.

विशेष म्हणजे, काल जिल्ह्यात काही भागांत थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे आता हातातून गेलेल्या पिकांची चिखलात पाहणी करून पंचनामे करण्याचा काय उपयोग, असा सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. ५० दिवसांचा पावसाचा खंड, पर्जन्यमानाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती लक्षात घेता आता केवळ औपचारिक पंचनाम्यांपेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे.

पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट नुकसानभरपाई आणि पीकविमा द्या….

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या प्रक्रियेत अडकवून न ठेवता सरसकट नुकसानभरपाई आणि पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि शेतकरी संघटनेचे देविदास कणखर यांनी केली आहे.

पालकमंत्री उशिरा का होईना, जिल्ह्यात दाखल होऊन बांधावर येत असल्याबद्दल धन्यवाद; मात्र काल थोडाफार पाऊस पडला म्हणून जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली किंवा पिके वाचली, असा समज करून घेऊ नये, असा उपरोधिक टोला शेतकरी संघटनांनी लगावला आहे. तब्बल ५० दिवसांचा पावसाचा खंड आणि पिकांची झालेली अवस्था दुष्काळी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे पंचनाम्यांचे थोतांड न घालता सरसकट नुकसानभरपाई, पीकविमा आणि तातडीची मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!