मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तब्येतीच्या कारणावरून तसेच व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत, पैसे आणले नाही तर फारकत देऊ, असा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शाहीनबी मलीक केसवाणी, रा. कुलमखेड, मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे वापी (गुजरात) येथील मलीक करीम खान केसवानी यांच्याशी झाला. लग्नानंतर सुरुवातीचे दोन-तीन महिने सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर २७ जून २०२२ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत तब्येतीच्या कारणावरून मारहाण करून त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पती मलीक करीम खान केसवानी हा व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. पैसे आणले नाही तर तुला फारकत देईन, अशी धमकी देऊन छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. सासू दिलशाद करीम खान केसवानी हिने स्वयंपाकघरात येऊ न देणे, मोलकरणीसारखी वागणूक देणे तसेच ‘तुझी लायकी नाही’ असे टोचून बोलून मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
तर नणंद करिष्मा करीम खान केसवानी हिने ‘तुझी मुलगी मला दत्तक दे, नाही दिली तर तुला नांदू देणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच विवाहितेला उपाशी ठेवून घरातील सर्व कामे करून घेतली आणि पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पती मलीक करीम खान केसवानी, सासू दिलशाद केसवानी आणि नणंद करिष्मा केसवानी, तिघेही रा. मोहन नगर, उमरगाव, जि. वापी (गुजरात) यांच्याविरुद्ध अप. क्र. ७०५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ८५, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.












