डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर–मालेगाव मार्गावर भरधाव काळीपिवळीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ मार्च रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वाशीम जिल्ह्याच्या हद्दीजवळ बळीराजा पेट्रोल पंपासमोर घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
या अपघातात शरद गणपतराव जाधव (वय ५५) हे गंभीर जखमी झाले होते. ते एका व्यक्तीसोबत मोटारसायकलवरून मालेगावकडे जात असताना बळीराजा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर निघत असताना मालेगावकडून डोणगावकडे येणाऱ्या भरधाव काळीपिवळीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत जाधव यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवित असताना ६ मार्च रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शरद जाधव हे मूळचे अन्य ठिकाणचे असले तरी ते डोणगाव येथील जावई असल्याने काही वर्षांपासून येथेच स्थायिक झाले होते. विशेष म्हणजे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी डोणगाव येथील अतिया पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातात त्यांचे दोन्ही पाय मोडले होते आणि त्या अपघातात जाकीर शाह मिस्त्री यांचा मृत्यू झाला होता. पंधरा ते वीस दिवसांपासून जाधव यांना कसेबसे चालता येऊ लागले होते; मात्र नियतीने पुन्हा अपघाताच्या रूपाने त्यांना गाठले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.













