बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात यंदा अत्यल्प आणि अनियमित पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, उडीद, ज्वारी यासह विविध पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके तसेच मशागतीवर मोठा खर्च केला आहे. आधीच शेतीचा उत्पादन खर्च वाढलेला असताना पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर कर्जफेड आणि पुढील हंगामाच्या खर्चाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच प्रलंबित कर्जमाफीच्या दुसऱ्या याद्या तातडीने जाहीर कराव्यात, पीक विम्याची रक्कम त्वरित वितरित करावी, यंदाचा पीक विमा लवकर द्यावा, लोडशेडिंग बंद करून सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करावा, आवश्यक ठिकाणी डीपी उपलब्ध करून द्याव्यात आणि ई-पिक पाहणी तातडीने पूर्ण करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना फी माफी देण्याची तसेच पशुधनासाठी चारा छावण्यांचा अग्रक्रमाने विचार करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
महागाई आणि वाढलेल्या शेती उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत अपुरी ठरत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर अधिक आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम वाढविण्याबाबत केंद्र शासनाकडे ठोस शिफारस करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हा समन्वयक गजानन धांडे, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, लखन गाडेकर, सुनील घाटे, गजानन उबरहंडे, विजय इतवारे, विजय इंगळे, गणेश रिंढे, सुनील भाग्यवंत, विजय राऊत, डॉ. अरुण पोफळे, संजय शिंदे, रामशंकर सोनूने, रविंद्र पवार, संजय गवळी, रफिक शेख करीम, बळीराम जाधव, अनिल सुरडकर, राहुल जाधव, सुनील टेकाले, शालिग्राम सोनुने, विजय पाटील, शेषराव सावळ, अब्दुल्ला पठाण, विजय सोनोने, समीर खाटीक, शाम सावळे, शांतीनाथ अपार, श्रावण बोरकर, रविंद्र गोरे, संतोष राजपूत, विश्वनाथ गरड, विलास राऊत, सतीश देवकर, श्रीकांत जाधव, गजानन गवई, गजानन बोडखे, दीपक गुळवे, कृष्णा सिनकर, अविनाश मघाडे, बबन चिकटे, प्रभाकर माघाडे, प्रवीण खरात, बबन खरे, अनिल बेंडे, अनिल राजपूत, मुख्तार शाह गुलाब शाह यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.













