Advertisement Advertisement

विहिरीत पाणी, पण वीज नाही; १५ गावांतील शेतकऱ्यांचा महावितरण उपकेंद्रावर ठिय्या! पिकं डोळ्यादेखत वाळत असल्याने शेतकरी संतप्त; कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित….

विहिरीत पाणी, पण वीज नाही; १५ गावांतील शेतकऱ्यांचा महावितरण उपकेंद्रावर ठिय्या! पिकं डोळ्यादेखत वाळत असल्याने शेतकरी संतप्त; कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील तब्बल १५ गावांतील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अखेर बांध फुटला. शेतात पिकं उभी, विहिरीत पाणी मुबलक; मात्र शेतीपंपाला वीजच मिळत नसल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासह खरीप पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट मंगरूळ नवघरे येथील महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रावर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले.

मंगरूळ नवघरे येथील उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या दहिगाव, मंगरूळ नवघरे, पांढरदेव, घानमोड-मानमोड, करतवाडी, वरखेड, नायगाव खु., नायगाव बु., पेनसावंगी, सावरखेड, उत्रदा-दहिगाव शिवार, डोंगरगाव यासह परिसरातील इतर गावांचा कृषी वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत आहे. यंदा पावसामुळे अनेक विहिरींमध्ये भरपूर पाणी असतानाही वीज नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.

पिकं वाळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी सकाळी ८ वाजल्यापासून उपकेंद्रावर ठिय्या देऊन बसले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी महावितरणने तातडीने उपाययोजना करून शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

अधिकारी फिरकले नाहीत; संताप वाढला….

आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर देविदास कणखर व विनायक सरनाईक यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. कृषी वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र दुपारी १ वाजेपर्यंत कोणताही जबाबदार अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला.

“विहिरीत पाणी असूनही वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. पिकं डोळ्यादेखत सुकत आहेत. वीजबिल वसुलीच्या वेळी तत्परता दाखवणाऱ्या महावितरणने शेतीला वीज देतानाही तितकीच तत्परता दाखवावी,” अशी संतप्त भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या….

  • मंगरूळ नवघरे उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १५ गावांचा खंडित कृषी वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा.
  • दिवसा पूर्ण दाबाने ८ तास वीजपुरवठा द्यावा.
  • वारंवार बिघाड होणाऱ्या रोहित्र व विद्युत लाईनची तातडीने दुरुस्ती करावी.

वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत उपकेंद्र सोडणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. तोडगा न निघाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी ८ ते १० गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता चव्हाणांचे आश्वासन; आंदोलन स्थगित….

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ३३/११ केव्ही उपकेंद्राची तांत्रिक तपासणी करून बिघाड तातडीने दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.

तसेच उद्यापासून सर्व १५ गावांना नियमित व सुरळीत कृषी वीजपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

मात्र दिलेल्या आश्वासनानुसार वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!