Advertisement Advertisement

EXCLUSIVE: आ.गायकवाड-आ.महाले पुन्हा आमने-सामने! राजकारणात ‘बाप तो बाप रहेगा’च्या गाण्यावरून बुलढाण्यात राजकारण तापलं! राजकारणात बाप कोण, योग्य वेळी दाखवून देऊ’ म्हणत आ.संजय गायकवाडनी दिल प्रत्युत्तर….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत राजकीय संघर्ष आता आरोप-प्रत्यारोपांपलीकडे जाऊन व्यक्तिगत आणि वादग्रस्त वक्तव्यांपर्यंत पोहोचला आहे. भाजप आमदार श्वेताताई महाले यांनी एका रॅलीदरम्यान धनुष्यबाण ताणत ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ चर्चेत आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आ.गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना, “‘बाप तो बाप रहेगा’ असे एखाद्या पुरुषाने म्हटले तर ठीक आहे; मात्र एखाद्या महिलेने आपण बाप असल्याचे म्हटल्यास बापासारखे शरीर कुठून आणणार?” अशा आशयाची टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यावरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी ‘राजकारणातील बाप कोण, हे योग्य वेळी दाखवून देऊ!असा इशाराही त्यांनी दिला.

मात्र, आ. श्वेताताई महाले या आपली बहीण आणि ताई असल्याचे सांगत गायकवाड यांनी दोघांमधील संबंधांचीही आठवण करून दिली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण दोघे एकत्र होतो, तसेच एका ताटात आणि एका चमच्याने जेवलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपला संघर्ष हा वैयक्तिक नसून राजकीय भूमिकांपुरता असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

दरम्यान, वाढदिवसाच्या रॅलीत वीज गेल्याच्या घटनेवरून आपल्यावर करण्यात आलेले आरोपही गायकवाड यांनी फेटाळून लावले. त्या वेळी आपण कर्नाटकात होतो आणि या प्रकाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्याकडे ‘हरामाचा पैसा’ नसल्याचे सांगत वाढदिवसासाठी पैशांची उधळपट्टी करण्याचा आरोपही त्यांनी नाकारला. वाढदिवसासाठी माणसे भाड्याने आणणे, अधिकारी-पोलिसांना कामाला लावणे आणि लोकांना शुभेच्छा देण्यासाठी ओढून आणणे, असे आरोपही त्यांनी विरोधकांवर केले.

विरोधकांवर टीका करताना गायकवाड यांनी, “ज्यांना कुत्रेही हुंगत नाहीत, ते ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ बनून नाचत आहेत,” असा आक्रमक टोला लगावला. महायुती एकसंघ असल्याचा दावा करताना स्थानिक भाजप काँग्रेसच्या दावणीला बांधली जाणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी आमदार महाले यांना दिला. त्यामुळे महायुतीतील स्थानिक राजकारणातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

दरम्यान, ‘बुलढाण्याचा कचरा चिखलीपर्यंत आला’ या श्वेताताई महाले यांच्या टीकेलाही गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. “बुलढाण्याच्या विकासाचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात दरवळत आहे. शहरात विकास झाला की कचरा, हे जनता ठरवेल,” असे ते म्हणाले. दोन्ही आमदारांकडून सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता कोणते वळण घेणार, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!