बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. राज्याच्या राजकारणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना, गायकवाड यांनी या चर्चेला आणखी हवा दिली आहे.
“देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी, अशी माझ्यासह अनेक आमदारांची इच्छा आहे,” असे आ. संजय गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही महाराष्ट्रातील शेतकरी-कष्टकऱ्यांची भावना….
आ. गायकवाड म्हणाले की, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आणि कष्टकऱ्यांची भावना आहे. मात्र, तेवढे संख्याबळ सध्या नाही.” त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या राजकारणात जावे आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील संभाव्य भूमिकेबाबत विविध नेत्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर गायकवाड यांना याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली.
‘निर्णय आमच्या हातात नाही….
मात्र, मुख्यमंत्रीपदाबाबतचा अंतिम निर्णय आपल्या हातात नसल्याचेही आ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. “एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत, त्यामुळे आम्हाला तसं वाटणं स्वाभाविक आहे. मी जर भाजपमध्ये असतो तर मला देवेंद्रजींबद्दलही असंच वाटलं असतं,” असे त्यांनी सांगितले.
तसेच हा निर्णय महायुतीच्या पातळीवर घेतला जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपची टीम आणि महायुतीतील नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
आ. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे राज्यातील मुख्यमंत्रीपद आणि महायुतीच्या राजकारणाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा रंग चढला असून, त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.














