डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एका गावात दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही मुलींची गर्भवती माता म्हणून आरोग्य विभागाकडे नोंदणी झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यातील एका अल्पवयीन विवाहितेच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या अल्पवयीन विवाहितेचीही प्रसूती लवकरच होणार असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये मेहकर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा एका तरुणासोबत विवाह झाला. तसेच दुसऱ्या युवकाने वाशीम जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचे सांगण्यात येते. विवाहानंतर दोन्ही मुली गर्भवती झाल्या. त्यांची गर्भवती माता म्हणून आरोग्य विभागाच्या उपकेंद्रात नोंदणी करण्यात आली होती.
दरम्यान, ऑगस्ट २०२६ मध्ये यातील एका अल्पवयीन विवाहितेची प्रसूती झाली. प्रसूतीपूर्वीच बाळाचा जन्म झाल्याने (प्री-मॅच्युअर) त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, त्याच प्रकरणातील दुसरी अल्पवयीन विवाहिता सध्या गर्भवती असून तिची प्रसूतीदेखील लवकरच होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
रुग्णालयातील उपचारादरम्यान अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांना पत्र दिले. या प्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी डोणगाव पोलीस ठाणे गाठल्याची माहिती आहे.
अल्पवयीन असताना गर्भवती म्हणून नोंद कशी झाली?
या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे दोन्ही मुली अल्पवयीन असतानाही त्यांची गर्भवती माता म्हणून आरोग्य विभागाकडे नोंदणी करण्यात आली. त्यामुळे अल्पवयीन मुलींचे विवाह झाले असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती कशी मिळाली नाही? तसेच त्यांच्या वयाची पडताळणी करूनही नोंदणी कशी झाली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. बालविवाहाच्या प्रकरणांची तपासणी आणि चाइल्ड डेटा रिव्ह्यू ऑडिटच्या पार्श्वभूमीवर या घटनेची माहिती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरी अल्पवयीन विवाहिता सध्या कामानिमित्त मोठ्या शहरात राहत असल्याचीही माहिती मिळत असून, तिच्याबाबतही संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात बालविवाहाला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर काय कारवाई होते, तसेच अल्पवयीन मुलींची आरोग्य विभागाकडे नोंदणी नेमकी कशी झाली, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.













