बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खरीप हंगामातील पिके हातातोंडाशी आलेली असताना पावसाने मागील पंधरा दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रोहींच्या कळपांचे नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील रोहींचा मोठ्या प्रमाणात संचार वाढल्याने शेतातील उभ्या पिकांची नासाडी होत आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
सध्या शेतांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, मका यासह विविध खरीप पिके जोमात आहेत. पेरणीपासून डवरणी, कोळपणी, खुरपणी, फवारणी आणि खतांपर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. अनेक शेतकरी कर्ज काढून पिकांची मशागत करीत आहेत. मात्र, पिके ऐन भरात असताना पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पावसाची आस लागून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या अडचणीत रोहींच्या कळपांनी आणखी भर घातली आहे. पिंपळखुटा शिवारात रोहींचे कळप शेतात घुसून उभ्या पिकांची नासाडी करीत आहेत. सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि मका यासारखी पिके रोहींकडून फस्त केली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
पावसाअभावी पिके धोक्यात असतानाच रोहींच्या उपद्रवामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. रात्रीच्या वेळी रोहींचे कळप शेतात शिरत असल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या रखवालीसाठी शेतात जागरण करावे लागत आहे.
या वाढत्या उपद्रवाकडे वन विभागाने तातडीने लक्ष देऊन जिल्ह्यातील रोहींचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.















