दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): समृद्धी महामार्गावर नगरहून नागपूरकडे जाणाऱ्या आयशेर वाहनाने समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयशेर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर कॉरिडॉरवर घडली. भागवत महादेव सानप (वय ३३, रा. राणेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे मृत चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक ओडी १९ यू ६१५७ हा समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी नगरकडून नागपूरकडे जाणाऱ्या आयशेर क्रमांक एमएच १६ सीडी ५२५२ ने समोरील कंटेनरला पाठीमागून धडक दिली. धडक जोरदार असल्याने आयशेर चालक भागवत सानप यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती सीआरओ संभाजीनगर यांच्याकडून पहाटे पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मलकापूर टीएबी अंतर्गत वाकी येथील समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे एपीआय राहुल पाटील, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पायघन तसेच पोलीस कर्मचारी इरफान शेख, आकाश यादव आणि राहुल कायंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस पथक पहाटे ५.३५ वाजता घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि पुढील दुर्घटना टाळता यावी, यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बॅरिकेडिंग केले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.
मृत भागवत सानप यांचा मृतदेह १०८ रुग्णवाहिकेने सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या घटनेची नोंद सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला यासह प्रकरणाचा पुढील तपास आणि आवश्यक कायदेशीर कारवाई पोलीस करीत आहेत.













