बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरात पाच जण गाढ झोपेत असतानाच अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाट फोडून तब्बल १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना बीबी येथे २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर घडली. या धाडसी घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीबी येथील रहिवासी वैभव खुशालराव नागरे यांच्या घरी चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरफोडी केली. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडले. कपाटातील १२ ग्रॅम वजनाची सुमारे ६० हजार रुपये किमतीची गहूमणी पोत आणि १० ग्रॅम वजनाची सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची एकदाणी, असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सकाळी उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस….
सकाळी घरातील मंडळी झोपेतून उठल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटाची पाहणी केली असता सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वैभव नागरे यांनी तातडीने बीबी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. चोरीचा माग काढण्यासाठी बुलढाणा येथील श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पाच जण झोपेत असताना चोरट्यांचा धाडसी डाव….
विशेष म्हणजे घरात तब्बल पाच जण झोपलेले असतानाही चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केले. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. बीबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, रात्रीची पोलिस गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठाणेदार गजानन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र कुटे पुढील तपास करीत आहेत. घरातील मंडळी गाढ झोपेत असताना झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे बीबी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.













