जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): शाळा म्हणजे विद्यार्थिनींसाठी सुरक्षित जागा मानली जाते; मात्र जामोद येथील जनता विद्यालय परिसरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करीन, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जामोद येथील जनता विद्यालय परिसरात हा कथित प्रकार घडला. आरोपीने अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग केला. त्यानंतर वाईट उद्देशाने तिचा हात पकडून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर आरोपीने मुलीच्या वडिलांसह त्यांच्या नातेवाइकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी अजिंक्य जगन्नाथ ताडे, रा. जामोद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७५, ७८, ३५१(३), २९६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.













