Advertisement Advertisement

अवैध रेतीवाल्यांचा महसूल पथकावर हल्ल्याचा प्रयत्न! देऊळगाव राजात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संताप, कामबंद आंदोलनाचा इशारा…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना १९ ऑगस्ट रोजी समोर आली. या प्रकारामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, फरार आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करताना महसूल विभागाला पोलीस आणि आरटीओ विभागाकडून आवश्यक सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कर्तव्य बजावताना अधिकारी-कर्मचाऱ्यांवरच हल्ल्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशी नाराजी महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. फरार आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

अवैध रेती रोखण्यासाठी सर्व विभागांनी एकत्र यावे

अवैध वाळू वाहतुकीविरोधातील कारवाई ही केवळ महसूल विभागाची जबाबदारी नसून, पोलीस आणि आरटीओ विभागानेही आवश्यक सहकार्य करणे गरजेचे आहे, असे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी स्पष्ट केले.

एकट्या महसूल विभागाला प्रत्येक वेळी तत्परतेने कारवाईसाठी उपस्थित राहणे शक्य होत नाही. संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास अवैध रेती वाहतुकीवर अधिक प्रभावीपणे आळा घालता येईल, असे त्यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाच्या भूमिकेवरही नाराजी

दरम्यान, खडकपूर्णा धरणाशी संबंधित जलसंपदा विभागानेही अवैध रेती वाहतुकीच्या प्रकरणात आपली जबाबदारी स्वीकारून आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा तहसीलदार डोंगरजाळ यांनी व्यक्त केली. जलसंपदा विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महसूल पथकावर हल्ला किंवा दबाव आणण्याचे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आता फरार आरोपींवर पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे महसूल विभागासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!