Advertisement Advertisement

पीक पाहणीसाठी पैसे मागितले तर सावधान! शेतकऱ्यांनी एक रुपयाही देऊ नये; कृषी विभागाचा इशारा….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पीक पाहणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यकांना शेतकऱ्यांनी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. संबंधित सहाय्यकांचे मानधन शासनाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्यामुळे पीक पाहणी, पीक नोंदणी किंवा अन्य संबंधित कामासाठी आर्थिक मागणी करणाऱ्या व्यक्तींना शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

सहाय्यकांना शासनाकडून मानधन….

पीक पाहणीसाठी नियुक्त सहाय्यकांना निर्भेळ पिकाच्या पाहणीसाठी प्रति प्लॉट १० रुपये, तर मिश्र पिकाच्या पाहणीसाठी प्रति प्लॉट १२ रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. हे मानधन शासनाकडून संबंधित सहाय्यकांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम घेण्याचा प्रश्नच येत नाही.

पीक पाहणीच्या नोंदी महत्त्वाच्या…

पीक पाहणीच्या नोंदीमुळे शेतात प्रत्यक्ष कोणते पीक घेतले आहे आणि त्याचे क्षेत्र किती आहे, याची माहिती शासनाकडे उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे कृषी क्षेत्राचे नियोजन, पिकांचे क्षेत्रफळ निश्चित करणे तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे सुलभ होते.

पैसे मागितल्यास तातडीने तक्रार करा…

पीक पाहणी करणाऱ्या व्यक्तीची ओळख निश्चित करूनच शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती द्यावी. पीक पाहणी किंवा पीक नोंदणीच्या बदल्यात पैसे, शुल्क अथवा अन्य आर्थिक मोबदला मागितल्यास कोणतीही रक्कम देऊ नये.

अशा प्रकारे पैशांची मागणी होत असल्यास शेतकऱ्यांनी तातडीने संबंधित महसूल अथवा भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!