चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देवदर्शनासाठी दुचाकीने निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा प्रवास अखेरचा ठरल्याची हृदयद्रावक घटना इसोली-धोत्रा मार्गावर घडली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गौतम विजय गवई (वय ३०, रा. इसोली) हे दुचाकीसह रस्त्यालगतच्या तब्बल ९० फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने इसोली गावावर शोककळा पसरली आहे.
गौतम गवई हे मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुचाकीने देवदर्शनासाठी घरातून निघाले होते. इसोली-धोत्रा मार्गावरून जात असताना एका ठिकाणी अचानक त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी थेट रस्त्यालगत असलेल्या सुमारे ९० फूट खोल दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीची खोली अधिक असल्याने बचावकार्य करत मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, दुचाकी घसरली की रस्त्यावरील अन्य काही कारणामुळे नियंत्रण सुटले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अमडापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दिलीप तोंडे पुढील तपास करीत आहेत.
गौतम गवई यांच्या अपघाती निधनाची वार्ता इसोली गावात पोहोचताच नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.













