बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): इंग्रजकालापासून प्रतीक्षेत असलेल्या खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनमध्ये समावेश करण्यात आला असून, प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ११ ऑगस्ट रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले.
रेल्वेमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्याची मागणी….
खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या पुढील कामांना आणखी वेग मिळावा, यासाठी रेल्वे विभागातील उच्चपदस्थ अधिकारी आणि बुलढाणा जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी ना. प्रतापराव जाधव यांनी केली. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.
‘गतीशक्ती’मध्ये समावेशामुळे प्रकल्पाला बळ….
देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला आणि विविध वाहतूक व्यवस्थांना एकात्मिक पद्धतीने चालना देण्यासाठी केंद्र सरकारने १३ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन सुरू केला. या महत्त्वाकांक्षी आराखड्यात खामगाव-जालना रेल्वे मार्गाचा समावेश झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आवश्यक प्रशासकीय व समन्वयात्मक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
अकोला-खंडवा रेल्वे मार्गालाही वेग देण्याची मागणी…
यावेळी प्रतापराव जाधव यांनी अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या कामाचाही मुद्दा रेल्वेमंत्र्यांसमोर मांडला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांतून जाणाऱ्या या नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू असले तरी त्याची गती संथ असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पालाही आवश्यक ती गती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
भूमी अधिग्रहणानंतर पुढील कामांना वेगाची अपेक्षा….
खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय होणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतल्यास भूमी अधिग्रहणासह पुढील प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल, अशी भूमिका ना. जाधव यांनी मांडली.
खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक दशकांच्या अपेक्षांशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकार, रेल्वे विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.















