मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाचा राग मनात धरून एका १५ वर्षीय शाळकरी मुलीला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा तसेच धमकी दिल्याचा प्रकार मोताळा शहरातील गणपती नगर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बोराखेडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी २२ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर एका मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ७ वाजता मुलगी कामानिमित्त बाहेर गेली असताना संबंधित मुलाचे वडील विजय सावळे (रा. गणपती नगर, मोताळा) यांनी तिला अडवले.
‘माझ्या मुलासोबत का वाद घातलास?’ असा जाब विचारत आरोपीने मुलीला अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर तिचा हात पकडून ओढत विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच पुन्हा आपल्या मुलाच्या भानगडीत पडल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
घडलेला प्रकार मुलीने आपल्या आजीला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जाब विचारण्यात आला. त्यावेळी आरोपीने मुलगी आणि तिच्या आजीलाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी २४ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांनी विजय सावळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, २९६, ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) २०१२ मधील कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.













