Advertisement Advertisement

बुलढाणा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! घरं, दुकानं, कृषी केंद्रं अन् मंदिरही सोडलं नाही;१० दिवसांत १० चोऱ्या, १० लाखांवर माल लंपास! चोरीला आडवा आलेल्या गावकऱ्याचा जीव घेतला!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात तब्बल १० चोरीच्या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये चोरट्यांनी १० लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे चोरीला विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाचा चोरट्यांनी जीव घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिवसाआड घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मेहकरपासून सुरू झाले चोरीचे सत्र….

३१ जुलैच्या रात्री मेहकर शहरातील सोनाटी चौफुल्लीवरील सुदर्शन किराणा दुकान फोडण्यात आले. या घटनेत चोरट्यांनी ५३ हजारांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केला. १ ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर ३ ऑगस्ट रोजी मलकापूर-नांदुरा एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या खामगाव येथील अर्चना मधुकर उगले यांच्या पर्समधून दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दोन महिलांना अटक केली.

५ ऑगस्ट रोजी मेहकर शहरातील तहसील चौकातील श्रीकृष्ण ज्वेलर्स फोडण्यात आले. दुकानातून सुमारे ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद असून, मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज गायब….

७ ऑगस्ट रोजी अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर भागात घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी जलंब पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पहुरजिरा येथे घरफोडी झाली. या घटनेत तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

९ ऑगस्ट रोजी शेगाव येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेचा सुमारे एक लाख रुपये किमतीचा आयफोन चोरीला गेला. महिलेच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

काटीतील चोरीला विरोध; ग्रामस्थाचा बळी….

९ ऑगस्टच्या रात्री नांदुरा तालुक्यातील काटी गावात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल तीन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरीला मज्जाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायसिंग सोळंकी या ग्रामस्थावर चोरट्यांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मलकापूर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

कृषी केंद्रे, मंदिरही चोरट्यांच्या निशाण्यावर….

९ ऑगस्ट रोजी गाडेगाव खुर्द आणि आसलगाव येथील दोन कृषी केंद्र फोडण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे २८ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जानेफळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोळी येथील नागेश्वर महादेव मंदिराची दानपेटीही चोरट्यांनी फोडली. त्यातून १ लाख ९८४ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी भिमराव माधव गवई, रा. सावत्रा याला अटक केली आहे.

आतापर्यंत केवळ तीन प्रकरणांचा छडा

गेल्या दहा दिवसांत झालेल्या चोरीच्या घटनांपैकी आतापर्यंत पोलिसांना केवळ तीन प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले आहे. मोळी येथील मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच प्रवासी महिलेच्या पर्समधील दागिने चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक झाली आहे. उर्वरित चोरी व घरफोडीच्या घटनांचा तपास सुरू आहे.

एकाच रात्री अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील संवेदनशील भागांत रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!