बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात एसटी बससेवेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात एसटी बसेसचे तब्बल ५० अपघात झाले आहेत. यामध्ये ४ अपघात प्राणांतिक, २१ गंभीर तर २५ अपघात किरकोळ स्वरूपाचे असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ४१ चालकांवर कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागासह प्रमुख मार्गांवर एसटी बस ही हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे प्रमुख साधन आहे. विद्यार्थ्यांपासून नोकरदार, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक प्रवासी एसटीवर अवलंबून आहेत. त्यामुळे सात महिन्यांत झालेल्या ५० अपघातांची संख्या चिंताजनक मानली जात असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अपघातांचे कारण शोधण्याची गरज….
पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब होते. त्यातच घसरडे रस्ते, वाहतूक कोंडी, अरुंद मार्ग तसेच वाहनांची तांत्रिक स्थिती यामुळे अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे अपघात झाल्यानंतर केवळ चालकांवर कारवाई करण्याऐवजी अपघातांच्या मूळ कारणांचा सखोल आढावा घेणे गरजेचे आहे.
एसटी बसेसची नियमित देखभाल, ब्रेक आणि टायरची तपासणी, वाहनांची तांत्रिक तपासणी, चालकांचे नियमित प्रशिक्षण तसेच अपघातप्रवण मार्गांचे सर्वेक्षण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
४१ चालकांवर कारवाई…
जिल्ह्यात झालेल्या एसटी अपघातांचा आढावा घेतल्यानंतर एसटी प्रशासनाकडून संबंधित चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ४१ चालकांवर कारवाई झाल्याची माहिती आहे. मात्र, अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चालकांवरील कारवाईसोबतच बसची फिटनेस तपासणी आणि मार्गावरील धोकादायक ठिकाणांवर आवश्यक उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सात महिन्यांतील एसटी अपघातांचा आकडा….
– एकूण अपघात : ५०
– किरकोळ अपघात : २५
– गंभीर अपघात : २१
– प्राणांतिक अपघात : ४
– कारवाई झालेले चालक : ४१
प्रवाशांच्या जीविताची जबाबदारी असलेल्या एसटी बससेवेत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अपघातांची कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.














