Advertisement Advertisement

घरासमोर पार्क केलेली १२ लाखांची किया सेल्टोस चोरीला; सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरासमोर पार्क करून ठेवलेली तब्बल १२ लाख रुपये किमतीची किया सेल्टोस कार दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खामगाव शहरातील तुळशी अपार्टमेंट परिसरात घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, दोन संशयित व्यक्ती कार सुरू करून घेऊन जाताना दिसून आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज नारायण चौधरी (वय ४१, रा. शिंदे स्वामी मंदिराजवळ, शिवाजी वेस, खामगाव) हे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दुकानाचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची किया सेल्टोस कार (एमएच ५६ ए १४५८) तुळशी अपार्टमेंट परिसरातील भवर यांच्या दुकानासमोर, घरासमोर नेहमीप्रमाणे पार्क करण्यात आली होती.

मध्यरात्री चोरट्यांनी साधला डाव

१ ऑगस्टच्या रात्री कार पार्क केलेली असताना दोन अज्ञात चोरट्यांनी कारवर डल्ला मारला. विशेष म्हणजे, कारची चावी ठरलेल्या ठिकाणीच असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चोरट्यांनी कारची चावी न वापरता अथवा अन्य पद्धतीने कार अनलॉक करून ती चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कार चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी परिसरात तसेच नातेवाइकांकडे कारचा शोध घेतला. मात्र, कारचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता २ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.२५ वाजता दोन अज्ञात व्यक्ती कार अनलॉक करून ती सुरू करताना दिसून आले. त्यानंतर हे दोघे कार शिंदे स्वामी मंदिराच्या दिशेने घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले.

या घटनेमुळे खामगाव शहरात वाहन चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!