बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : शहरातील खामगाव मार्गावरील नागसेन नगर परिसरात भिंत अंगावर कोसळून अवघ्या दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दीक्षा कृष्णा चव्हाण असे मृत मुलीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा ही बुलढाण्यातील गांधी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी होती. ती वडील कृष्णा वसंता चव्हाण आणि आई रेखा चव्हाण यांच्यासह नागसेन नगर येथील नालंदा वाचनालयाजवळ राहत होती. दुर्दैवाने भिंत कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
चव्हाण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समोर आले आहे. दीक्षाची आई रेखा चव्हाण या परिसरातील घरांमध्ये धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर वडीलही मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात. रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या या कुटुंबावर एकुलत्या चिमुकलीच्या मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी हळहळ व्यक्त केली असून, या गरीब कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून शासनाच्या आपत्ती सहाय्य योजनेंतर्गत या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सध्या या दुर्दैवी घटनेमुळे नागसेन नगर परिसरात शोककळा पसरली असून, दीक्षाच्या निधनाने चव्हाण कुटुंबासह परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.













