देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील देऊळगाव मही येथे भरधाव व निष्काळजीपणे स्कुटी चालवत एका मजुराला धडक दिल्याप्रकरणी स्कुटी चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख अयास शेख निजाम (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अरुण बबनराव जायभाये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१ व १२५(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटना २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते ६.३० वाजण्याच्या सुमारास देऊळगाव मही येथे घडली. आरोपीने आपल्या ताब्यातील स्कुटी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत शेख अयास यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डाव्या पायाला व गुडघ्याला गंभीर दुखापत झाली.
फिर्यादीच्या तोंडी तक्रारीसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे २ ऑगस्ट २०२६ रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. कलीम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गुन्ह्याची नोंद पोलीस हेकॉ. संजय गोरे यांनी केली आहे.














