Advertisement Advertisement

इंस्टाग्रामचा गैरवापर करत एका महिलेसोबत व्हिडिओ व्हायरल करत बदनामी केली; एकाविरुद्ध गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियाचा गैरवापर करून एका ४० वर्षीय महिलेबाबत इन्स्टाग्रामवर अश्लील भाषा वापरत बदनामी केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील वाढत्या गैरवापराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव येथील ४० वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, महादेव बाबुराव सुरडुजे (रा. कोकर्डा, ता. दर्यापूर, जि. अमरावती) याने इन्स्टाग्रामवर संबंधित महिलेबाबत आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरत व्हिडिओ प्रसारित केला. तसेच त्या व्हिडिओमधून महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, २१ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजता फिर्यादीच्या नातेवाईकांनी फोन करून संबंधित इन्स्टाग्राम व्हिडिओची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादीने व्हिडिओ पाहिला असता त्यामध्ये तिच्याबाबत अश्लील शिवीगाळ, अपमानास्पद वक्तव्ये आणि धमकीवजा मजकूर असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ३५६(१) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून संबंधित सोशल मीडिया अकाऊंट, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. दोषी आढळल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!