चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे पत्नीकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २३ जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणात मृताच्या खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्याने पोलिसांनी पत्नीसह दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा येथील सुरज रामभाऊ तेजनकर या तरुणाचा विवाह सन २०२१ मध्ये वंदना ज्ञानेश्वर रिंढे रा. मोहाडी, ता. सिंदखेडराजा हिच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगी असून, मुलगी नऊ महिन्यांची असताना वंदना माहेरी राहण्यासाठी गेली होती.
मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, वंदना हिचे सतीश रामेश्वर काकडे (रा. बोरगाव काकडे, ता. चिखली) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय पती सुरज रामभाऊ तेजनकर यानांहोता. यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. सुरज हा पत्नीकडे फारकतीची मागणी करत होता. याच कारणावरून वंदना हिने यापूर्वी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतरही सुरज मानसिक तणावाखाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.२३ जुलै रोजी सुरज याने अंढेरा येथील आपल्या काकांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृताच्या खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्या. या चिठ्ठ्यांचा तपासात महत्त्वाचा भाग म्हणून विचार केला जात आहे.
या प्रकरणी मृताची आई शशिकला रामभाऊ तेजनकर (वय ६०, रा. अंढेरा) यांच्या फिर्यादीवरून वंदना सुरज तेजनकर आणि सतीश रामेश्वर काकडे यांच्याविरुद्ध अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दिनेश घुगे करीत आहेत.













