Advertisement Advertisement

“पंढरपूरला नाही जाता आलं? मग शेगावला या; आषाढी एकादशीला श्रींचं मंदिर रात्रभर खुलं!”

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता २४ जुलैच्या रात्री श्रींचे मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असून, २५ जुलै रोजी दिवसभरही भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मराठवाडा, खान्देश, जळगाव तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक श्रींच्या समाधी दर्शनासाठी शेगावमध्ये येतात. या पार्श्वभूमीवर संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे काकडा आरती व भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. रात्री ८ ते १० या वेळेत श्रीहरी कीर्तनाचा भक्तांना लाभ मिळणार आहे.

भाविकांसाठी श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, संस्थानच्या भक्तनिवासात नियमानुसार निवासाची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता, सुरक्षा आणि शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था ठेवण्यात आली असून, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानचे सेवेकरी तत्परतेने सेवा देणार आहेत.

आषाढी एकादशी उत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने भाविकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!