Advertisement Advertisement

विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतच भरवली शाळा; सीईओंच्या हस्तक्षेपाने सहा शिक्षकांची तातडीने नियुक्ती!भिंगारा निवासी शाळेसह चाळीस टापरीतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अखेर मार्गी; पालकांच्या आंदोलनाला यश….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भिंगारा येथील जिल्हा परिषद निवासी शाळा आणि चाळीस टापरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरून काढण्याच्या मागणीसाठी पालकांनी सोमवारी (२० जुलै) थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयात विद्यार्थ्यांसह शाळाच भरवली. या अनोख्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गुलाबराव खरात यांनी तातडीने सहा शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश देत प्रश्न निकाली काढला.

भिंगारा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून सहावी ते दहावीच्या वर्गांसाठी सात शिक्षकांची आवश्यकता होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले नाहीत, असा आरोप जय आदिवासी संघटनेचे राधेश्याम खरात यांनी केला.

यामुळे संतप्त पालकांनी राधेश्याम खरात, देवीदास डावर, नंदू सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली ७५ हून अधिक विद्यार्थ्यांना बुलढाण्यात आणून जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणातच शाळा भरवली. “जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही,” असा ठाम पवित्रा पालकांनी घेतला.

या आंदोलनाची गंभीर दखल घेत सीईओ गुलाबराव खरात यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. त्यानंतर शिक्षण विभागाला तातडीने आदेश देत भिंगारा शाळेसाठी पाच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्रे पालकांच्या उपस्थितीतच देण्यात आली.

याचवेळी चाळीस टापरी येथील जिल्हा परिषद शाळेचीही समस्या सोडविण्यात आली. या शाळेत ५८ विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत होता. दोन शिक्षकांची गरज लक्षात घेऊन तेथेही एका अतिरिक्त शिक्षकाची तात्काळ नियुक्ती करण्यात आली.

३४२ आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण आता सुरळीत….

भिंगारा येथील सुभाषचंद्र बोस निवासी वसतिगृहात राहून पहिली ते दहावीपर्यंत एकूण ३४२ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते पाचवीसाठी पाच शिक्षकांची पदे असली तरी मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या बदलीनंतर काही पदे रिक्त झाली होती. तसेच सहावी ते दहावीसाठी सात शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अध्यापनावर मोठा परिणाम झाला होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सध्या पाच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!