Advertisement Advertisement

आम्ही पोलिस आहोत’ म्हणत शेतकऱ्याला गंडा; तपासणीच्या बहाण्याने ३२ हजारांची सोन्याची अंगठी लंपास,! बुलढाणा-धाड मार्गावरील चिखला शिवारातील घटना; अज्ञात दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):पोलिस असल्याची बतावणी करून तपासणीच्या नावाखाली एका शेतकऱ्याची सुमारे ३२ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा-धाड मार्गावरील चिखला शिवारात घडली. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास रामसिंग वाघ (वय ६५, रा. चिखला) हे ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतीचे काम आटोपून पायी घरी जात होते. बुलढाणा-धाड मार्गावरील दिगंबर पांडुरंग वाघ यांच्या शेताजवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.

यातील एकाने स्वतःची ओळख ‘पोलिस’ अशी करून देत अफू, चरस व गांजाबाबत तपासणी करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी त्यांच्या खिशांची झडती घेतली. खिशातील मोबाईल तपासून पुन्हा परत दिला. त्यानंतर “सोन्याच्या अंगठीचा नंबर तपासायचा आहे” असे सांगून हातातील अंगठी काढण्यास सांगितले.

अंगठी सहज निघत नसल्याने एका आरोपीने स्वतः ती काढून “आता परत देतो” असे सांगत ती आपल्या बॅगेत ठेवली. काही क्षणांतच मोबाईल परत देऊन दोघेही दुचाकीवरून वेगाने पसार झाले.

फिर्यादी विलास वाघ यांनी आरडाओरड केली, मात्र आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकारात सुमारे पाच ग्रॅम वजनाची ३२ हजार ३५७ रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली.

या प्रकरणी विलास वाघ यांच्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

नागरिकांसाठी आवाहन :

अनोळखी व्यक्ती स्वतःला पोलिस किंवा इतर अधिकारी असल्याचे सांगून तपासणी करत असल्यास त्यांची ओळखपत्रे तपासावीत. संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!