देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील त्र्यंबकनगर परिसरातील एका व्यक्तीला सातत्याने मानसिक त्रास देत जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्का रमेश उगले (वय ३३, रा. त्र्यंबकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राम चौधरी व सागर म्हस्के (दोघेही रा. त्र्यंबकनगर, देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ३१०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी व फिर्यादी हे शेजारी तसेच नातेवाईक आहेत. आरोपी राम चौधरी हा वारंवार चारचाकी वाहन उभे करण्याच्या कारणावरून वाद घालत होता. याबाबत फिर्यादीचे पती रमेश गुलाबराव उगले यांनी जाब विचारल्यानंतर त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दुसरा आरोपी सागर म्हस्के हाही वारंवार त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, फिर्यादीच्या पतीमुळे आरोपी घेत असलेला जमीन व्यवहार रद्द झाल्याच्या कारणावरूनही आरोपींकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. या सततच्या त्रासाला कंटाळून २३ मार्च २०२६ रोजी दुपारी रमेश उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.













