शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेगाव शहरातील गायत्री नगर परिसरात राहण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यावसान वृद्ध आई-वडिलांना मारहाण करण्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलगा आणि सुनेविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबुराव जानोजी घ्यारे (वय ६५, रा. बहादूरपुरा, ता. बाळापूर, जि. अकोला, सध्या गायत्री नगर, शेगाव) यांच्या तक्रारीवरून राजेश बाबुराव घ्यारे व त्यांची पत्नी प्रतिभा राजेश घ्यारे (रा. गायत्री नगर, शेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना २९ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. घरात राहण्याच्या कारणावरून झालेल्या वादात आरोपी राजेश घ्यारे यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत, “तुम्ही येथून निघून जा, मला या घरात राहायचे आहे,” असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी वस्तूने उजव्या डोळ्याच्या वर वार केल्याने बाबुराव घ्यारे जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याजवळ रक्तस्त्राव झाला. तसेच त्यांच्या पाठीवर व हातावरही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी प्रतिभा राजेश घ्यारे यांनी फिर्यादींची पत्नी राजकन्या घ्यारे यांचे केस धरून त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.
जखमी बाबुराव घ्यारे यांच्या जबाबासह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.












