Advertisement Advertisement

मोठी बातमी अन्नत्याग आंदोलनाची..! तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; संतप्त आंदोलकांनी फेकला भाजीपाला, प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आज तिसऱ्याच दिवशी धोकादायक वळण घेतले. जिल्हाभरात आंदोलनाचा वणवा भडकला असतानाच बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका संतप्त तरुण शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याच्याकडील आगपेटी जप्त केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

आज दुपारी साडेअडीच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲड. शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमले होते. जिल्हाधिकाऱ्यांना सातबाऱ्याचे वाण देण्यासाठी पाच जणांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी कार्यालयात गेले असताना बाहेर उभ्या आंदोलकांना पोलिसांनी गेटवरच रोखून धरले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकाएकी रस्त्यावर दूध, कांदे, टोमॅटो आणि विविध भाजीपाला फेकत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसर भाजीपाल्याच्या चिखलाने भरून गेला.

याच गोंधळात गर्दीतून पुढे आलेल्या विठ्ठल खेडेकर (रा. अंत्री खेडेकर, ता. चिखली) या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले. आंदोलनस्थळी तैनात पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि त्याच्या खिशातील आगपेटी जप्त केली. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. या घटनेने आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून जिल्हाभरात आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. खामगाव येथे मध्यरात्री उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पेठ येथील पुलावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. जळगाव जामोद येथे शेतकरी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढले, तर चिखली तालुक्यातील उदयनगर येथे आंदोलकांनी थेट पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

१५ जूनपासून बुलढाण्यातील निवासस्थानी रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. “संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय होईपर्यंत अन्नाचा कणही ग्रहण करणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीतही खालावल्याची माहिती समोर येत आहे.

शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना तीव्र होत चालली असून आंदोलन दिवसेंदिवस अधिक उग्र स्वरूप धारण करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आत्मदहनाचा प्रयत्न हा त्या संतापाचा कळस मानला जात असून पुढील काही तासांत आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!