मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज) माहेराहून सासरी जाण्यासाठी निघालेली २१ वर्षीय विवाहित महिला आणि तिचा दोन वर्षीय मुलगा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ४४/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. अर्चना यशवंत जवरे (रा. वडनेर भोलजी, ता. नांदुरा) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी पायल रुपेश निकम (वय २१) व नातू शंशाक रुपेश निकम (वय २) हे सुमारे १५ दिवसांपूर्वी माहेरी आले होते. १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पायल व तिच्या मुलाला भुसावळ येथे सासरी जाण्यासाठी मलकापूर बसस्थानकावर आणून मलकापूर-भुसावळ एसटी बसमध्ये बसविण्यात आले.
मात्र, दुसऱ्या दिवशी (१५ जून) सकाळी जावई रुपेश निकम यांनी फोन करून पायल व शंशाक हे भुसावळ येथे पोहोचले नसल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला असता दोघांचाही कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
बेपत्ता पायल हिचा रंग सावळा, उंची सुमारे ६ फूट, चेहरा गोल, केस काळे, गालावर व मानेवर तीळ असून अंगात आकाशी रंगाची साडी, ग्रे रंगाचा ब्लाउज, पायात सँडल व गळ्यात चांदीची चैन आहे. तर शंशाक याचा रंग सावळा, उंची सुमारे २ फूट, चेहरा गोल, केस भुरकट, तोंडात चार दात असून अंगात पांढऱ्या रंगाचा फुलांचा हाफ बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची थ्री-फोर चड्डी व हातात चांदीचे कडे आहेत.
सदर महिला व बालकाबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल शेळे करीत आहेत.













