मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्युज): शेतीच्या रस्त्याच्या जुन्या वादातून एका विवाहितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहडा शेतशिवारात घडली. या प्रकरणी दोन पुरुषांसह एका महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कोलारा येथील असून त्यांची रोहडा शेतशिवारात शेती आहे. त्या गेल्या ४० वर्षांपासून शेतातच वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी संगीता रामकृष्ण पवार यांचे शेत असून दोन्ही कुटुंबांमध्ये शेताच्या रस्त्यावरून वाद सुरू होता. हा वाद १ जून रोजी गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे सदस्य व पंच यांच्या उपस्थितीत मिटविण्यात आला होता.
मात्र त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादींचे पती घरी नसताना शेजारील रामकृष्ण गुलाबराव पवार व रमेश गुलाबराव पवार हे त्यांच्या घरासमोर येऊन फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करू लागल्याचा आरोप आहे.
फिर्यादी महिला घराबाहेर आल्यानंतर रामकृष्ण पवार याने वाईट उद्देशाने तिचा हात धरून ओढत शेताच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रमेश पवार यानेही छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिचा पुतण्या गणेश मदन काळे, त्याची पत्नी शितल काळे आणि धीर मदन काळे हे घटनास्थळी धावून आले व त्यांनी महिलेची आरोपींच्या तावडीतून सुटका केली.
यानंतर आरोपींनी गणेश काळे व धीर काळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्याचवेळी संगीता रामकृष्ण पवार हिनेही घटनास्थळी येऊन शितल काळे व फिर्यादीच्या पुतण्याचे केस ओढून मारहाण केली तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून रामकृष्ण गुलाबराव पवार, रमेश गुलाबराव पवार आणि संगीता रामकृष्ण पवार (सर्व रा. गाडगेनगर, बुलढाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, २९४, ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.













