उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): किन्ही सवडत शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी तब्बल १९ शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील सुमारे ३,२७६ फूट केबल तसेच झटका मशीन आणि इतर साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, घटना घडून तब्बल १२ दिवस उलटल्यानंतर ६ जून रोजी अमडापूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत किन्ही सवडत येथील दत्तात्रय भास्कर आरज (वय ३६) यांनी अमडापूर पोलिस पोस्टेत तक्रार दिली. तक्रारीनुसार, कुसुंबा-कुसुबी शिवारातील गट क्रमांक ५६ मध्ये त्यांची चार एकर शेती असून तेथे तीन बोअरवेल आहेत. २६ मे रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर बोअरवेलमधील केबल चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातूनही केबल व झटका मशीन चोरीस गेल्याचे समोर आले.
चोरी झालेल्या साहित्यामध्ये पुरुषोत्तम बराटे (३५० फूट), विशाल उद्धव आरज (३५० फूट), रेखा भास्कर चोपडे (३५० फूट), उद्धव आरज (३५० फूट), उषा वसंता बराटे (६१ फूट), गोविंदा शंकर मानकर (१५० फूट), ज्ञानेश्वर नारायण सावडतकर (३०० फूट), दिलीप दामोदर आरज (६० फूट), देविदास सावडतकर (३०० फूट), जनार्दन गणपत महाले (१०० फूट), इंदुबाई गणेश आरज (२३० फूट), रामराव सुदाम गवई (११० फूट), मुरलीधर पांडुरंग क्षीरसागर (५५ फूट), शोभा अवचितराव आरज (७० फूट), श्रीकृष्ण सावडतकर (२५० फूट) यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील वायर आणि झटका मशीनचा समावेश आहे.
तसेच नारायण रावजी सावडतकर व विजय समाधान बराटे यांची झटका मशीनही चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, किन्ही सवडत शिवारातील चोरीची मालिका अद्याप थांबलेली नाही. ७ जूनच्या रात्रीदेखील विनोद बराटे यांचे झटका मशीन, बॅटरी तसेच अन्य साहित्य चोरीस गेले. याशिवाय आणखी ५ ते ६ शेतकऱ्यांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
सततच्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करून गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.














