देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सावखेड भोई शिवारात शेतीच्या वादातून कांदाचाळ पाडून कांद्यांची नासधूस केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कांदाचाळ, कांदे व चारा मिळून सुमारे ४ लाख ७४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. अरुणा कारभारी डोणे (वय ३५, रा. सावखेड भोई) व आरोपी हे नातेवाईक असून त्यांच्यात शेतीच्या कारणावरून वाद सुरू होता. ४ जून रोजी सकाळी सुमारे ९ वाजता आरोपींनी संगनमत करून जेसीबीच्या सहाय्याने फिर्यादीच्या शेतातील कांदाचाळ पाडली. तसेच चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यांची नासधूस केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय आरोपींनी फिर्यादीच्या चाऱ्याच्या गंजीला आग लावून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, फिर्यादीची मुलगी अश्विनी डोणे हिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी रुख्मिणी डोणे (रा. सावखेड भोई), गंगा पवार (रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे), बाबुराव कामटे व अभिजीत कुमार (दोघे रा. भिवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २६४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत.














