बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गंभीर घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. खामगाव, शेगाव, मलकापूर, मलकापूर ग्रामीण, अमडापूर आणि जळगाव जामोद परिसरात अत्याचाराचा प्रयत्न, घरफोड्या, चोरी, मारहाण आणि बेपत्ता झालेल्या महिला-तरुणींची प्रकरणे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गोपाळ नगर येथील ज्ञानेश्वर मोतीराम आवारकर याने मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने आरोपी तेथून पसार झाला. कुटुंबीयांनी विश्वासात घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शेगाव शहरातील सावता नगर परिसरात देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारत ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर मलकापूर शहरातील विद्याविकास नगर आणि संताजी नगर भागात अज्ञात चोरांनी घरफोडी व चोरीचे प्रयत्न करून नागरिकांची झोप उडवली आहे.
खामगावमध्येच आणखी एका प्रकरणात भाडेकरूनेच घरमालकाचा विश्वासघात करत घरातील इलेक्ट्रिक साहित्य, फॅन, सब-मिटर आणि लोखंडी ग्रील असा २० हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरखेड बुद्रुक शिवारात शेतरस्त्याच्या वादातून एका शेतकऱ्यासह त्याच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघेही जखमी झाले असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील असोला नाईक येथील ३४ वर्षीय महिला ६ जून रोजी घरातून दवाखान्यात जाते असे सांगून निघाली होती. मात्र ती अद्याप घरी परतली नसल्याने मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
तसेच जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील २१ वर्षीय तरुणीही घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या दोन दिवसांत उघडकीस आलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख पुन्हा वाढताना दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.














