Advertisement Advertisement

स्मशानभूमीत राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेची दुर्दैवी मृत्यूची घटना; साखरखेर्डा परिसरातील घटना…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या एका ३४ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ जून रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मृत महिलेचे नाव सौ. शारदा प्रकाश धनसरवाड (वय ३४) असे आहे. त्यांचे पती प्रकाश रमेश धनसरवाड हे मूळचे धानकी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहेत. स्मशानजोगी व्यवसायामुळे हे कुटुंब काही काळापासून साखरखेर्डा येथील हिंदू स्मशानभूमीत वास्तव्यास होते.

स्मशानभूमीची स्वच्छता, देखभाल आणि वृक्षसंवर्धनाचे काम करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून या कुटुंबाला येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनीही त्यांना वेळोवेळी मदतीचा हात दिला होता. गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून त्यांच्यासाठी एक छोटेसे निवासस्थान उभारण्यात आले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत या कुटुंबाची गावात ओळख निर्माण झाली होती.

माहितीनुसार, घटनेच्या दिवशी कुटुंबातील इतर सदस्य बाहेर गेलेले असताना घरात एकट्याच असलेल्या शारदा धनसरवाड यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. रविवारी सकाळी स्मशानभूमीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला असून अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांच्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मेंधने करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!