लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): लोणार तालुक्यातील मौजे वडगाव तेजन येथे शनिवारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने एका शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे मोठे नुकसान केले. गावातील शेतकरी आशा रामप्रसाद म्हस्के यांच्या गट क्रमांक २९७ मधील शेतात बसविण्यात आलेल्या शक्ती सोलर पंपाच्या सोलर प्लेटा वादळामुळे तुटून नुकसानग्रस्त झाल्या आहेत.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सोलर पंपावरील प्लेटा उखडून तुटल्याने पंपाची कार्यक्षमता पूर्णपणे बंद पडली आहे. परिणामी शेतातील पिकांना पाणी देण्याचे काम ठप्प झाले असून शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर या नुकसानीमुळे आणखी संकट उभे ठाकले आहे.
नुकसान झाल्यानंतर शेतकरी आशा रामप्रसाद म्हस्के यांनी संबंधित विभागाकडे तातडीने पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिके व कृषी उपकरणांचे नुकसान झाल्याची चर्चा असून प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.















