मंगरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करून विक्रीसाठी नेत असलेल्या एका आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत 72 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी पंचासमक्ष केलेल्या प्रोव्ही रेडदरम्यान संबंधित आरोपी त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवर देशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. आरोपीकडून “सखू संत्रा” नावाच्या देशी दारूच्या प्रत्येकी 90 मिली क्षमतेच्या 440 शिश्या जप्त करण्यात आल्या. या दारूची अंदाजे किंमत 17 हजार 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय आरोपीच्या ताब्यातील होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-28-BF-3185) किंमत अंदाजे 50 हजार रुपये तसेच विवो कंपनीचा मोबाईल किंमत 5 हजार रुपये जप्त करण्यात आला. अशाप्रकारे एकूण 72 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 35(3) अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल त्यावेळी हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.












