Advertisement Advertisement

“प्रशासन म्हणते इंधनाचा पुरेसा साठा आहे, मग या रांगा संपत का नाहीत?” डिझेल टंचाईने शेतकरी संतप्त; चिखलीत रास्ता रोको, लोणारचा व्हिडीओ व्हायरल…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): प्रशासनाकडून जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या आणि कॅनच्या रांगा काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः पेरणी हंगाम तोंडावर असताना डिझेलच्या टंचाईमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून आता हा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे.

जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर रात्रंदिवस वाहनांच्या आणि कॅनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. उन्हातान्हात तासन्तास थांबूनही इंधन मिळत नसल्याने शेतकरी व वाहनधारकांचा संयम ढळत चालला आहे. “प्रशासन म्हणते इंधनाचा पुरेसा साठा आहे, मग या रांगा संपत का नाहीत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, चिखलीतील मेहकर फाटा परिसरात २० मे रोजी रात्री शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. पेरणीपूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट महामार्गावर बसून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. मेहकर फाटा हा विविध मार्गांना जोडणारा मध्यवर्ती आणि कायम गजबजलेला परिसर असल्याने आंदोलनामुळे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास तास-दीड तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना शांत केले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

याच दरम्यान लोणार शहरातील एका पेट्रोल पंपाबाहेरील धावपळीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. इंधन वाटप सुरू झाल्याचे समजताच शेतकरी आणि वाहनधारक कॅन घेऊन नंबर लावण्यासाठी अक्षरशः धावत सुटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. काहींनी तर दोरीला चार-पाच कॅन बांधून ते ओढत धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधनासाठी नागरिकांची होत असलेली ही धावपळ जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती अधोरेखित करत आहे.

सध्या पेट्रोल पंपांवर कुठे गोंधळ, कुठे धावपळ, तर कुठे इंधनासाठी हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पाहायला मिळत असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!